वाटा करियरच्या (भाग २ )
करियरच्या वेगळ्या वाटा (भाग २ )
मागच्या आठवड्यात ठरवल्याप्रमाणे हुशार राव अगदी वेळेवर आले, पण जर्मन डॉक्युमेंट्सच्या भाषांतराचे काही ईमेल क्लाएंटला परत हवे होते त्याची गडबड सुरु असल्यामुळे त्यांना थोडी वाट बघावी लागली. बडबडया स्वभावाच्या हुशार रावांनी तेवढ्यात आमच्या ऑफिस मधे कसली धावपळ चालू आहे ते विचारुन घेतल. भाषांतराची काम नेहमीच अर्जन्ट येतात, त्यात सरकारी कागद पत्रांची मजा अशी की, "कालच द्यायची होती, एकाच दिवसाचा वेळ दिला आहे" , अशी असतात. पण जर्मन क्लाएंटची कामं अगदी व्यवस्थित प्लान करुन येत असली तरी कधीतरी अशी गडबड असतेच. अपेक्षेप्रमाणे जर्मन कागद पत्रांबद्दल ऐकून हुशार रावांचा गप्पांचा होरा नंतर जर्मन भाषेच्या उपयुक्ततेकडे वळला.
जर्मन — दोन महायुद्वांमध्ये हारून‚ रसातळाला जाऊन देखील पहील्या पाच महासत्तांमध्ये जर्मनीला त्यांच्या तंत्रज्ञान आणि संशोधक वॄत्तीला स्थान आहे. सर्वोत्तम बनविण्याचा ध्यास असलेल्या जर्मन कंपन्यांनी आपली उत्पादने जगभरात पोहोचवली आहेत| मर्सिडीज‚ बी एम डब्ल्यू‚ ऑडी यासारख्या ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपन्या‚ श्नायडर‚ शिंडलर‚ सिमेन्स‚ बॉश या सारख्या बहूआयामी कंपन्या आपल्या उत्पादनांना सर्वत्र असणारी मागणी पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत आहेत| अशा महासत्तेची आणि तंत्रज्ञानाची जर्मन भाषा युरोपिअन भाषा समुहात मोडते. ए 1 ते सी 2 अशा सहा टप्प्यांमध्ये शिकवली जाते. या भाषेतील व्याकरण आणि रचना थोडी संस्कॄत भाषेशी साधम्र्य दाखविणारी असल्यामुळे भारतीयांना पटकन आत्मसात करता येते. पण एका गोष्टीची काळजी घ्यायला हवी‚ ती म्हणजे पहिल्या दोन लेव्हलस मध्ये भाषेची फक्त तोंडओळख होते त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी किंवा वरच्या पदावर काम करण्यासाठी बी 2 या लेव्हल पर्यंत शिकणे गरजेचे असते.
10वी नंतर जर्मन भाषा शिकण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे रशिया प्रमाणेच मोफत शिक्षण. जर्मनी मध्ये तांत्रिक शिक्षण म्हणजे इंजिनिअरींग आणि मास्टर्स हे मोफत आहे ‚ जर तुम्ही ते जर्मन भाषेत शिकत असाल तर.. यासाठी तुमची पूर्वतयारी असावी लागते आणि ऍडमिशन घेण्यापूर्वी 'सी1' पर्यंत तुमची भाषेची तयारी झालेली असली पाहीजे. इंजिनिअरींगच्या प्रमाणेच आयटी ‚ बँकिंग‚ इंपोर्ट एक्सपोर्ट‚ भाषांतर‚ दुभाषी अशा अनेक क्षेत्रात या भाषेला मागणी आहे. एल अँड टी, टेक महिंद्रा प्रमाणेच भारतात आलेल्या अनेक जर्मन कंपन्या ‘जर्मन येणारे उमेदवार दया’ असं सांगून दुजोरा देत आहेत.
![]() |
| बर्लिन |
सध्याच्या आणि भविष्यातल्या संधी बघून एखादी एशियाई आणि एखादी युरोपियन भाषा आपल्याला अवगत असावी असा विचार मनाशी पक्का करून हुशार रावांनी पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटण्यासाठी आमचा निरोप घेतला.


Comments
Post a Comment